तो धावत होता जीव मुठीत घेऊन

विनंती… पूर्ण वाचा…
तो धावत होता जीव मुठीत घेऊन
चौफेर उधळलेला घोडाच जणू
बेभान
बेलगाम
चोहीकडे वाळवंट
लख्ख उन
अन तो सैरभैर
अरेरे … पडला…
ठेच लागली बहुदा
उठला, पुन्हा धावतोय
लंगडतोय…
वेदना त्याच्या चेहेऱ्यावरून वाहताहेत…
फिकीर नाही
तो धावतोय, नद्या आटवत….
आता नद्याही आटल्यात
सुकी पडलीत पात्र
ओलावा कुठेही नाही
पात्र नाममात्र उरलित….
दिशाहीन उधळलाय तो
अडखळत, धडपडत, ठेचा खात
वार्याशी स्पर्धा करत
धावतोय…………
अंगातले त्राण आता संपत आलेत
वेग मंदावलाय
पाय रक्ताळलेत, हात सोल्वटलेत
पण तो बेफिकीर…
अरेरे
हे काय?? वादळ ???
आता काही खर नाही
अशा आवस्थेत वादळाला कसा झेलणार??
झाड, झुडूप अरे साध गवतही नाहीये आजूबाजूला आधारासाठी
वार्याचा वेग वाढत चाललाय
अन त्याचा घटत….
चालण आता अशक्य होऊन बसलय
अडकलाय एकाच जागी
रेती आता नाकातोंडात जातेय
जीव गुदमरतोय…
ओढा रे त्याला बाहेर
गाडला जातोय तो…
पण वादळात कोण जाणार….

रेती आता छातीपर्यंत आलीये
पूर्ण पणे अडकलाय…
जाणार। गाडला जाणार….
नक्कीच… थोडाच वेळ उरलाय आता…
चमत्कार। वादळ शमल….
वाचला बिचारा…
सूर्यही मावळायला आलाय…
तो निपचित पडलाय
रेतीत अडकून
आता जीवघेणी थंडी…
जीवघेणी थंडी अन मन सुखावणारा चंद्र प्रकाश…
अरे, तो तर रेतीत गडून बसलाय….
छान झाल, नाहीतर रात्रीच्या या बेकार थंडीने जीव घेतला असता त्याचा…
"जे होत ते चांगल्यासाठीच"
विश्वास ठाम झालाय
नवी उमेद मिळालीये…
सूर्योदय……
केविलवाणी धडपड, बाहेर पडण्याची
परिस्थितीच्या कचाट्यातून…
आला रे बाहेर आला
पुन्हा पळतोय
नव्याने……
जखमा मातीने माखल्यात
उन परत डोईवर आलाय
वेदना असह्य होताहेत
पण आता सवय झालीये…
असह्य वेदना सुसह्य झाल्यात….
अरेरे चक्कर आली
गरगरतय सार
कोसळला . . . . .
बेशुद्धी . . .
उठला … अरे। हे काय???
चोहुकडे हिरवळ….
अंगावर सावली पडलीये
गोंधळलाय। हे कस झाल ??
उठून टेकला झाडाला
हायस वाटतंय… जखमा भरताहेत आता
थंड वारा सुखावतोय जीवाला
ओह्ह्ह !! अंगात वीज संचारल्यासारखा उठला
परत धवतोय। वेग वाढलाय आता …
पायाखाली रुक्ष रेती नाही, आता गवत आहे
जाणवतंय पायांना
ताण निवळलाय आता चेहेऱ्यावरचा…
अरे रे. काटा बोचला पायात।
परत रक्त, परत वेदना
विव्हळतोय…. .
आता दुर्लक्ष करून चालणार नाही
धावताना लक्ष द्यायला हव. . .
पूर्वीपेक्षा यातना कमी आहेत
पण हलगर्जी नको…
वेग मंदावलाय। नजर स्थिरवलिये….
रस्त्यावर…
आजू बाजू झाड आहेत
फळांची , फुलांची. . . .
मध्येच थांबतोय आस्वाद घेतोय
अन पुन्हा धावतोय….
थकलाय
आलाय परात तो त्याच वळणावर
इथेच घसरला होता पाय
अन तो जाऊन पडला होता त्या निर्दयी वाळवंटात. . . . .
इथेच 'ती' भेटली होती
ती वेळ
ती जागा अन
ती परिस्थिती…. नको पुन्हा नको…
सारा भूतकाळ सर्र्र्र्कन डोळ्यासमोरून गेला…
शहारला तो. . .
काटा आल अंगावर
मटकन खाली बसला…
स्वताच वजन पेलवेना झालाय. . . .
स्मशान शांतता…
रडतोय तो… ओरडतोय वेड्यासारखा . . . .
रडूदेत त्याला . . .
सगळी घुसमट बाहेर येतेय…
हलक वाटेल . . . .
पुन्हा स्मशान शांतता…. . .
तो पहा जगातला सर्वात सुखी चेहेरा…
शांत अन समाधानी. . . .
नजर स्थिरवलिये अन तो ही …
शांत बसलाय जमिनीवर
काडीचीही हालचाल नाही
नजर शून्यात. . .
हवेचा एक झोत आला
अन् पडला रे तो खाली…
तो गेला…
सुटला एकदाचा…
चेहेरा कसा समाधानी वाटतोय…
अरे अंत नाहीये हा. . .
तो पहा. . .
पुन्हा जन्म घेतलाय त्याने. . .
आता साध्वी शांतता आहे चेहेर्यावर
चालही शांत आहे … संतुलित अगदी
निघालाय तो, पुन्हा नव्या प्रवासावर…
पण या वेळी. . . . . .
-नि. सु. देशमुख

Comments

Popular posts from this blog

पावसाळी प्रकाश

जलचक्र