नेहेमीपेक्षा जरा शांतच वाटत होता समुद्र. साधारण वर्षभरापूर्वी आलो होतो इथेच. आज पुन्हा, ह्यावेळी रूममेट्स बरोबर.
रूमवर लाईट गेलेली, म्हणून मग बऱ्याच दिवसांपासून रखडलेला मरिन ड्राईव्हला यायच्या बेताला काल मुहूर्त लागला. इथे पोहोचलो, जोडप्यांच्या घोळक्यात थोडीशी मोकळी जागा हेरली आणि आम्ही बसलो, सर्वेश आडवा झाला. रात्रीचे 12 वाजायला जेमतेम 5 मिनिट उरले असतील. तरी पुण्याच्या JM ROAD ला दुपारी 12 ला नसते एवढी गर्दी तिथे होती.
शेजारीच एक जोडपं गप्पा मारण्यात मग्न होत. त्यांच्या पलीकडे एका मुलाचे डोळे ओढणीने बांधलेले होते. डोळे बांधून ठेवणाऱ्या 'ती'ची लगबग चालली होती. डोळे उघडू नकोस 2 मिनिट थांब असं ती त्याला सांगत होती.
तिच्या तयारी वरून त्याचा वाढदिवस आहे हे तर स्पष्ट होतच होत. 12 वाजले, तिने मेणबत्त्या पेटवल्या, त्याचे डोळे उघडले आणि तिने HAPPY BIRTHDAY TO YOU म्हणायला सुरुवात केली. तोपर्यंत गप्पांमध्ये मग्न असलेल्या जोडप्याची निघायची वेळ झालेली, जाता जाता त्यांनीहि तिच्या सुरात सूर मिसळले, तिचा आनंद आता द्विगुणित झाला होता. तिने त्या जोडप्यालाही बोलावलं, सगळ्यांनी मिळून केक खाल्ला.
हे सगळं चालू असताना, इकडे सर्वेश "ए नादान परींदे" गाणं म्हणत होता, एका परींद्याने खरंच येऊन त्याला खांद्यावर शाब्बासकी द्यावा तसा "प्रसाद" देऊन त्याच्या रस्त्याने तो उडून गेला. सर्वेशवर पोट धरून हसण्याचा मैत्रीधर्म मी आणि भूषण ने अगदी मनापासून पाळला.
गाडीत पाणी आहे जा साफ करून ये म्हणून त्याला गाडीची चावी दिली आणि आम्ही हसत राहिलो. सर्वेश समोर गेला आणि 'ती' केक घेऊन आमच्यासमोर आली, आम्हाला केक ऑफर केला. तिला त्याच नाव विचारलं आणि मागून आलेल्या त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मग ते दोघेही समोर बाकी अजून लोकांना केक वाटायला निघून गेले. तोवर सर्वेश पाण्याची बाटली घेऊन परत आला. हाताला राहिलेले केक चे अवशेष आम्ही त्याला दाखवले आणि पुन्हा त्याच्यावर हसण्याचा असुरी आनंद आम्ही लुटला.
ते दोघे नंतर खुप वेळाने परत आले, त्या जागेवर विसावले, आम्ही परत समुद्राच्या शांततेत हरवून गेलो.
एव्हाना आजूबाजूला बसलेले लोक उठून त्यांच्या जागी नवीन लोक येऊन बसलेले.
इतक्यात कोणीतरी बडबडल्याचा आवाज आला. "क्या मस्त सजाके राक्खा है"
मी उत्सुकतेने तिकडे पाहिलं. चाळिशीकडे झुकलेला अवलिया, लाल Tshirt, खांद्याला सॅक अडकवलेली, हातात ब्रँडेड पेपर बॅग, तिथे उभा राहून कौतुकाने केलेल्या सजवटीकडे पाहत होता.
त्याच्याकडे बघून कोणीही सांगेल त्याने मागच्या कितीतरी महिन्यांपासून अंघोळ केली नसावी. त्याच्या कपड्यांचा आणि पाण्याचा संबंध मागच्या पावसातच आला असावा बहुतेक.
"ती"ने मघाशी केकवर अर्धवट जळालेल्या मेणबत्त्या बाजूला काढून ठेवलेल्या. त्या मेणबत्या अवलिया च्या नजरेत आल्या.
"किसिका B'day था शयाद, अच्छा है, पर थोडा b'day अभि बाकी है" म्हणत त्याने त्या मेणबत्त्या उभ्या केल्या, आणि पेटवल्या. मी चकित होऊन आता अजून हा काय करणार आहे हे बघत होतो.
त्याने मेणबत्त्या पेटवल्या, आणि "Happy Birthday To You" असा टाळ्या वाजवत, सुरात गायला सुरुवात केली.
गाणं म्हणता म्हणता त्याने तिथलं त्या दोघांचं सेलिब्रेशन उचलून हातातल्या पिशव्यांमध्ये भरायला सुरुवात केली. केक चा पुठ्ठा, प्लास्टिक पिशवी, कागदाचे कपटे हे सगळं त्याने आपल्याकडच्या पिशव्यांमध्ये भरलं. आणि मेणबत्त्या तश्याच जळत्या ठेऊन तो आमच्या समोरून निघून गेला.
त्याच्या ह्या कृत्याने मी अवाक होऊन त्याच्याकडे पहात राहिलो. शेजारी मुलामुलींचा घोळका सेल्फी काढण्यात मग्न होता, त्यांच्या जवळ छोटासा कागद पडलेला, त्याने जाऊन तो उचलला. घोळक्यातल्या एका मुलीच एक्दम लक्ष गेल्याने ती दचकली, "आप टेन्शन मत लो, मजा करो, बस कचरा मत करो" असं त्यांना बोलून तो समोर निघून गेला.
तो समोर चालला होता, त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाहत राहिलो. एव्हाना डोक्यात प्रश्नांचा तांडव चालू झालेला.
कोण हा अवलिया? इथली सफाई करण्यासाठी लोक आहेत मग हा का सफाई करतोय? सफाई ची इतकी आवड असेल तर मग त्याच्या शरीराची स्वच्छता त्याने का ठेवली नसावी? असे असंख्य प्रश्न डोक्यात फिरू लागले.
आता ह्यांची उत्तर शोधण्याचा एकाच पर्याय होता, तो स्वतः. भूषण आणि सर्वेशला सांगितलं तुम्ही बसा इथे मी त्याच्याशी बोलायला जातोय.
मारिन ड्राईव्ह ओबोराय हॉटेल समोरून मी त्याच्या शोधार्थ निघालो. मारिन ड्राईव्ह जिकडे संपतो त्या दिशेने तो गेला होता. मी हि तिकडे निघालो. त्याच्याशी नेमकं काय बोलायचं ह्याचा मनातल्या मनात तयारी करत होतो.
तो कुठेच दिसत नव्हता, मारिन ड्राईव्हचा शेवट, जिथे पोलिसांनी बॅरिकेड लावून प्रवेश बंदी केली आहे तिथवर मी जाऊन पोहोचलो. आजूबाजूला कुठेच त्याच्या वास्तव्याची निशाणी नव्हती. पण तिथे कुठेच कचरा दिसत नव्हता म्हणजे तो नक्कीच इथे येऊन गेला.
बॅरिकेड्स जवळ उभा राहून मी हताशपणे समुद्राकडे पाहू लागलो तेव्हा पुन्हा मला त्याचा तोच आवाज ऐकू आला. "कैसे होगा मेरे देश का, लोग सिख रहे है सुना था, क्या पता क्या सिख रहे है" आवाज नक्की कुठून येतोय हे मी शोधू लागलो. माझं लक्ष बॅरिकेड्स च्या पलीकडे गेलं, अवलिया तिथे बॅग आणि पिशवी मधल सामान नीट लावून ठेवत स्वतःशीच बोलत होता.
नकळत मी बॅरिकेड्स च्या अगदी जवळ जाऊन तो काय बोलतोय हे ऐकू लागलो.
त्याच लक्ष माझ्याकडे गेलं. "भैय्या, सामान लेना मत बोहोत किमती चिझे है अंदर" माझ्याकडे बघत अगदी गंभीर पणे त्याने विनवणी केली. मीही स्मित हास्य करून नकारार्थी मान हलवत, तुझ्या अनमोल सामानाला माझ्याकडून काहीच इजा नाही अशी खात्री त्याला दिली.
तो हसला.
डोक्यातल्या प्रश्नांची उत्तरं मला त्याच्याकडून हवी होती, पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याची परवानगी मला नव्हती.
तो मुक्त होता, त्याच्या जगात त्याला कसली बंधन नव्हती, आणि मी त्याच्या जगात जाऊ शकत नव्हतो.
असंख्य अनुत्तरित प्रश्नांच्या जाळ्यात मला सोडून हळू हळू तो अंधारात हरवून गेला.

शकत नव्हतो.
असंख्य अनुत्तरित प्रश्नांच्या जाळ्यात मला सोडून हळू हळू तो अंधारात हरवून गेला.
No photo description available.

Comments

Popular posts from this blog

पावसाळी प्रकाश

जलचक्र

तो धावत होता जीव मुठीत घेऊन